- महावाणी : विर पुणेकर
- १९ जून २०२०
चंद्रपूर : जिल्ह्यात मालगाडीच्या धडकेमुळे ११ रानडुकरांचा मृत्यू झाला (pig death in Chandrapur) आहे. ही घटना आज १९ जून पहाटे साडे पाच वाजता चंद्रपुरातील मुल शहराजवळ घडली. घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील घनदाट जंगलामधून जाणाऱ्या चांदाफोर्ट- गोंदिया रेल्वेमार्गावर हा अपघात झाला आहे. आज सकाळी बल्लारपूर मार्गे गोंदियाकडे जाणाऱ्या मालगाडीच्या पुढ्यात रानडुक्कर आल्याने हा अपघात झाला. या अपघातात ११ रानडुकरांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीस आली.
मुल शहराजवळ या मालगाडीने रानडुकरांना धडक दिली. चंद्रपूर शहरातील दुसरे रेल्वेस्थानक असलेल्या चांदाफोर्ट येथून एक महत्त्वाचा रेल्वे मार्ग गोंदिया-जबलपूरकडे जातो. याच रेल्वेमार्गावर मूल शहराजवळ असलेल्या घनदाट जंगलाच्या परिसरात ही घटना घडली.
सध्या प्रवासी रेल्वे गाड्या बंद असल्यामुळे या मार्गावरून गाड्यांची वारंवारिता कमी आहे. केवळ मालवाहतूक करणाऱ्या गाड्या या भागातून जात आहेत. आज सकाळी बल्लारपूर मार्गे गोंदियाकडे जाणाऱ्या रेल्वे मालगाडीच्या पुढ्यात अचानक रानडुकरे आल्याने त्यांना जीव गमवावा लागला.
रानडुकर हे चपळ असतात. अत्यंत चपळ असलेल्या रानडुकरांचा रेल्वेगाडीच्या धडकेत मृत्यू कसा झाला याबाबत मात्र आश्चर्य व्यक्त होत आहे. वनविभागाचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले असून रानडुकरांना पुरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.