ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तरतूद
१९ नोव्हेंबर २३
चंद्रपूर : सप्टेंबर महिन्यात बल्लारपूर बायपासवर ट्रक आणि ऑटोरिक्षाच्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना वने व सांस्कृतिक कार्य तथा पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांनंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत जाहीर झाली आहे. ना. श्री. मुनगंटीवार यांनी शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानंतर त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि दीड महिन्याच्या कालावधीत चारही मृतांच्या कुटुंबांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये याप्रमाणे एकूण 20 लाख रुपयांची मदत जाहीर झाली आहे.
27 सप्टेंबर 2023 रोजी बल्लारपूर बायपासवर ट्रक आणि ऑटोरिक्षा यांच्यात भीषण अपघात झाला. यात राजकला मोहुर्ले, इरफान खान (रा. बाबुपेठ, चंद्रपूर), अनुष्का खेरकर (रा. बल्लारपूर) आणि संगिता अनिल चहांदे (रा. साईनगर, गडचिरोली) या चार जणांचा मृत्यू झाला. मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळावी यासाठी महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र खांडेकर आणि जिल्हाध्यक्ष मधुकर राऊत यांनी पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीची त्वरित दखल घेत ना. मुनगंटीवार यांनी जिल्हा प्रशासनाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने 25 ऑक्टोबर 2023 रोजी शासनाकडे अर्थ सहाय्याकरिता प्रस्ताव पाठविला. प्रस्ताव पाठविल्यानंतर ना. मुनगंटीवार यांनी विशेष लक्ष दिले आणि सातत्याने पाठपुरावा केला.
प्रस्ताव पाठविल्यानंतर 20 दिवसांच्या आतच मुख्यमंत्री सचिवालयाने मृतांच्या कायदेशीर वारसदारांना प्रत्येकी पाच लक्ष रुपये याप्रमाणे चारही कुटुंबांसाठी 20 लक्ष रुपये इतके अर्थसहाय्य मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मंजूर केले आहे. हा निधी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुंबई शाखेतून, चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाचे खाते असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया, जटपुरा गेट शाखा, चंद्रपूर येथील बँक खात्यात परस्पर वर्ग करण्यात आले आहे. ( 20 lakhs to the families of those killed in the accident on Ballarpur Bypass ) ( Mahawani ) ( chandrapur )