ना.सुधीर मुनगंटीवार यांनी पाठपुरावा करताच धान नोंदणीची वाढविली मुदत

Mahawani


पूर्व विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ


महावाणी -  विरेंद्र पुणेकर
३० नोव्हेंबर २३

        चंद्रपूर : खरेदी केंद्रांची मोजकी संख्या, इंटरनेट नेटवर्कची समस्या, अवकाळी पावसाचे वातावरण यामुळे धान नोंदणीची मुदत 31 डिसेंबर 2023 पर्यंत वाढविण्यात आली आहे. शेतकऱ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.

        चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात मोठ्या संख्येने धान उत्पादक शेतकरी आहेत. आधारभूत योजनेअंतर्गत ते नेमण्यात आलेल्या खरेदी केंद्रावर नोंदणी करून धानविक्री करतात. या जिल्ह्यांमध्ये केंद्रांची संख्या मोजकी आहे. अनेक दुर्गम गावांमध्ये इंटरनेट नेटवर्कची समस्या आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीचाही तडाखा विदर्भाला बसत आहे. अशात शेतकऱ्यांची प्रचंड संख्या लक्षात घेता धान नोंदणीची मुदत वाढविण्यात यावी, असा आग्रह ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता.

        यासंदर्भात ना. श्री. मुनगंटीवार यांनी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री श्री. छगनजी भुजबळ यांच्याशी फोनवर चर्चाही केली व त्यांना पत्रही दिले. ना. श्री. मुनगंटीवार यांच्याशी झालेल्या चर्चेची तातडीने दखल घेत श्री. भुजबळ यांनी संबंधित विभागाला निर्देश दिले. त्यानुसार धान नोंदणीची मुदत आता 31 डिसेंबर 2023 पर्यंत वाढविण्यात आली आहे. मुदत वाढल्याचा फायदा पूर्व विदर्भाच्या पाचही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त केले आहे. ( mahawani ) ( Sudhir bhau mungantiwar ) ( Chandrapur, Bhandara, Gadchiroli, Gondia, Nagpur ) 

To Top