२१ डिसेंबर २३
राजुरा : चंद्रपूर जिल्हयातील राजुरा मतदारसंघातील राजुरा, कोरपना, गोंडपिपरी तालुक्यामध्ये विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिक वास्तव्यास असून त्यातील अनेक कुटुंब आर्थिक दृष्ट्या मागास आहेत. महाराष्ट्र शासनाच्या नुकत्याच दि 8 डिसेंबर 2023 रोजी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने अंतर्गत चंद्रपूर जिल्हयातील 1799 वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांच्या प्रस्तावाला कार्योत्तर मान्यता व निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा शासन निर्णय निघालेला असून त्यात माझे मतदारसंघातील राजुरा, कोरपना, गोंडपिपरी या तालुक्यांचा समावेश दिसून आलेला नाही. त्यामुळे गोरगरीब, गरजू नागरीक हक्काच्या घरांपासून वंचित आहेत.
त्यामुळे चंद्रपूर जिल्हयातील राजुरा, कोरपना, गोंडपिपरी तालुक्यातील लाभार्थ्यांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत वैयक्तिक घरकुले तात्काळ मंजूर करण्यात यावीत अशी मागणी लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी राज्याचे इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्याकडे केली आहे.
विशेष म्हणजे या योजनेंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, पोंभुर्णा, बल्लारपूर, चंद्रपूर, जिवती, सावली, भद्रावती या तालुक्यातील 1799 व्यक्तिगत घरकुल लाभार्थ्यांच्या यादीला कार्योत्तर मंजुरी मिळाली असून दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे शासन आदेश निघाला आहे. या योजनेंतर्गत राजुरा, कोरपना, गोंडपिपरी सह जिल्ह्यातील इतरही उर्वरित तालुक्यातील विमुक्त जाती /भटक्या जमाती प्रवर्गातील घरकुल लाभार्थ्याची यादी पंचायत समिती कडून जिल्हा स्तरीय समितीकडे पाठविले असतांना जिल्हा स्तरीय समितीने शासनाकडे पाठविलेल्या फक्त 1799 वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली असून जिल्ह्यातील इतर तालुक्यातील विमुक्त जाती / भटक्या जमातीतील नागरिकांवर अन्याय झालेला आहे. आ. धोटे यांनी सभागृहाच्या माध्यमातून शासनाला विनंती आहे कि, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेपासून वंचित राहिलेल्या नागरिकांना लाभ देण्यासाठी राजुरा, कोरपना, गोंडपिपरी सह जिल्ह्यातील इतरही तालुक्यातील उर्वरित लाभार्थ्यांचा समावेश करून या प्रवर्गातील गोर- गरिबांना हक्काच घरकुल देण्याबाबत.निर्णय घेतला जावा. यासाठी आ. धोटे यांनी हा औचित्याचा मुद्दा उपस्थित करीत मागणी केली आहे. ( mahawani ) ( Rajura ) ( Yashwantrao Chavan Mukt wasahat Scheme )