राजुरा, जिवती, कोरपना, चंद्रपूर, मूल, सावली तालुक्यातील जवळपास २० ग्रामसभेतील सदस्य सहभागी
महावाणी - विरेंद्र पुणेकर०६ फेब्रुवारी २४
गोंडपिपरी : अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी अधिनियम २००६, नियम २००८ व सुधारित नियम २०१२ अन्वये चंद्रपूर जिल्हात जवळपास ४८५ गावांना सामूहिक वन हक्क मिळाले आहेत. जिल्हात २०१२ मध्ये पाचगाव या गावाला सर्वात पहिल्यांदा १००० हे.आर मध्ये सामूहिक वन हक्क मंजूर झाले आहे. जवळपास गेल्या १०-१२ वर्षांपासून पाचगाव ग्रामसभा आपले अधिकार वापरून स्वशासन संकल्पना राबवत आहे. वन हक्क कायदयातील कलम (३) (१) (ग) अन्वये गौण वन उपज संकलन, साठवणूक, विल्हेवाट, विक्री आणि व्यवस्थापन च्या अधिकाराने बांबू विक्री ची पारदर्शक प्रक्रिया पाचगाव ग्रामसभेतुन राबवत असून गावातील लोकांना रोजगार व उपजीविका वाढीत महत्वाची भूमिका बजावताना दिसत आहे. (Around 20 gram sabha members from Rajura, Jivati, Korpana, Chandrapur, Mool, Savli talukas participated)
मात्र जिल्हातील इतर गावांना देखील सामूहिक वन हक्क प्राप्त झाले असून सुद्धा तुलनेने गौण वन उपज ग्रामसभेतुन गौण वन उपज विक्रीची संपूर्ण प्रक्रिया होताना दिसून येत नाही. याच अनुषंगाने इतरही ग्रामसभा सक्षम होऊन आपले गौण वन उपजाचे अधिकार वापरून रोजगार आणि उपजीविका संसाधनात वाढ करतील याउद्देशाने दिनांक ५/२/२०२४ ला टाटा सामाजिक विज्ञान संस्थान व FES संस्था यांच्या संयुक्त सहकार्याने ग्रामसभा पाचगाव येथे अभ्यास दौरा करण्यात आला. यात राजुरा, जिवती, कोरपना, चंद्रपूर, मूल, सावली तालुक्यातील जवळपास २० ग्रामसभेतील सदस्य सहभागी झाले होते. ज्या गावात सामूहिक वन हक्क क्षेत्रात विशेषता बांबू आहेत त्या ग्रामसभा सदस्यांना सहभागी करण्यात आले होते. या अभ्यास भेटीत पाचगाव ग्रामसभेचा सामूहिक वन हक्क प्राप्त करताना दिलेल्या लढ्याचा इतिहास समजून घेण्यात आला. प्रश्नउत्तरे व चर्चा करून वर्तमान काळात ग्रामसभेने कशा पद्धतीने गौण वन उपज संकलन सोबतच विक्री, व्यवस्थापन विपणन करताना जंगलाचे संवर्धन करावे तसेच अधिकार व कर्तव्य समजून घेऊन सामुदायिक विकास साध्य करावा असे ग्रामसभा पाचगाव च्या वतीने मार्गदर्शन केले गेले. सोबतच ग्रामसभा सक्षमीकरण, ग्रामसभेचा दस्तऐवज कसा हाताळावा याविषयी देखील माहिती दिल्या गेली. पाचगाव जंगलात परिभ्रमण करून बांबू निष्कासनाविषयी माहिती जाणून घेण्यात आले. सहभागी ग्रामसभा सदस्यांनी मिलिंद बोकील लिखित पुस्तक 'कहाणी पाचगावची' च्या प्रति देखील विकत घेतल्या. या अभ्यास दौऱ्यात टाटा सामाजिक विज्ञान संस्थान चे प्रतिनिधी अमोल कुकडे, जगदीश डोळसकर (Jagdish Dolsakar), नितीन ठाकरे, हिमानी लोंढे, प्रवेश सुटे, सहभागी होते तर FES संस्थेचे प्रतिनिधी शुभम वणवे सहभागी होते. (In collaboration with the Tata Institute of Social Sciences, the gram sabhas of the district made a study tour to Pachgaon!) (mahawani)