मनपातर्फे डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम ( कंटेनर सर्वे ) सुरु #chandrapur

Mahawani


ब्रिडींग चेकर्स करणार घरांची तपासणी : नागरिकांनी सहकार्य करावे -चंद्रपूर मनपा चे आवाहन


महावाणी - विरेंद्र पुणेकर
०१ जुलै २०२४

चंद्रपूर : मनपा आरोग्य विभागामार्फत संभाव्य डेंग्यु व इतर कीटकजन्य रोगांच्या प्रतिबंधासाठी डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम राबविण्यात येत असुन याअंतर्गत आरोग्य चमु शहरातल्या प्रत्येक घरांची तपासणी करणार असल्याने घरी येणाऱ्या ब्रिडींग चेकर्सना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.    

     पावसाळा सुरु होताच डेंग्यु व इतर कीटकजन्य रोगांचा प्रसार होण्यास सुरवात होते. पावसात मोकळे भूखंड, बंद घराची छते, चालु बांधकामाची ठिकाणे, घरी वापर नसलेली ठिकाणे, कूलर,टायर, भंगारातील वस्तु,डबे इत्यादी ठिकाणी पाणी साचुन राहते व याच जागा डासांची उगमस्थाने बनतात. या उगमस्थानांचा शोध घेऊन ती नष्ट करणे व नागरीकांना सचेत करणे यासाठी आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात डॉ. नयना उत्तरवार यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात २८ ब्रिडींग चेकर्स तसेच स्वच्छता निरीक्षक यांच्याद्वारे डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम सुरु करण्यात आली आहे.  

     डेंग्यु डास हा स्वच्छ व साचलेल्या पाण्यात आढळतो त्यामुळे आपल्या घराची तपासणी करणे आवश्यक आहे. पाणी साठवण्याची भांडी कोरडी करणे,डासअळी आढळल्यास अबेट द्रावण टाकणे, पाणी साठा मोठा असले तर त्यात गप्पी मासे टाकणे आवश्यक आहे. गप्पी मासे पाण्यातील डासांची अंडी खाऊन टाकतात ज्याने डासांचा प्रादुर्भाव कमी होतो. डेंग्यु डासाची उत्पत्ती टाळणे आवश्यक असल्याने आठवड्यातून एक दिवस हा कोरडा दिवस पाळावा.

      डासांमुळे पसरणाऱ्या आजारांमध्ये डेंग्यूताप व डेंग्यू रक्तस्रावी ताप हे मुख्य आजार आहेत. ताप येणे, अंगावर पुरळ येणे, डोळ्याच्या खोबणीमधे दुखणे, पाठदुखी, डोकेदुखी, स्नायूमध्ये वेदना, सांधेदुखी ही डेंग्यूची प्रमुख लक्षणे आहेत. वस्तुतः डेंग्यू हा सामान्य आजार आहे परंतु सर्वसामान्यांना  या रोगाबाबत माहिती नसल्याने किंवा अपुरी माहिती असल्याने काही वेळा तो जीवघेणा ठरू शकतो. म्हणून प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेद्वारे याबाबत नागरिकांना वारंवार माहिती देऊन जनजागृती करण्यात येत आहे.      

      संभाव्य डेंग्यु व इतर कीटकजन्य रोगांच्या प्रतिबंधास पुढील काही दिवस महत्वाचे आहेत. आधी ज्या घरांमध्ये रुग्ण आढळले होते ते व संभाव्य दुषित घरे यावर विशेष लक्ष ठेवले जात असुन नागरीकांनी आपल्या घरी साचलेले पाणी राहु नये यांची काळजी घेण्याचे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. ( mahawani ) ( chandrapur mahanagar palika )

To Top