सिंचाई विभागाच्या दुर्लक्षामुळे जातोय लाखो लिटर पाणी वाया
- महावाणी : विर पुणेकर
- २४ ऑगस्ट २०२४
चंद्रपूर : नागभिड तालुक्यातील ब्रिटिशकालीन घोडाझरी तलावाच्या कालव्याला धामणगाव माल या गावाजवळ मोठा भगदाड पडला आहे. यामुळे आठवडाभरापासून सुरू असलेला कालवा आज दुपारी तातडीने बंद करावा लागला. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड तालुक्यात ब्रिटिशकाळात तयार झालेला घोडाझरी मध्यम प्रकल्प कार्यरत आहे, ज्यातील पाण्याचा उपयोग मुख्यतः सिंचनासाठी केला जातो. नागभिड आणि सिंदेवाही तालुक्यातील हजारो एकर शेतीला या तलावातील पाणी मिळतं.
या तलावाच्या पाण्याचा पुरवठा ब्रिटिशकालीन कालव्याद्वारे करण्यात येतो. घोडाझरी तलावापासून सोनापूर, गोविंदपुर मार्गे नवरगावपर्यंत कालवा तयार करण्यात आला आहे, जो आजही शेतीला पाणी पुरवण्यासाठी वापरला जातो. मात्र, सिंचाई विभागाकडून या कालव्याची नियमित दुरुस्ती न केल्याने दरवर्षीच ठिकठिकाणी भगदाडं पडतात, ज्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जातं.
यावेळी, १५ ऑगस्ट २०२४ ला घोडाझरी तलावाचं पाणी शेतीसाठी सोडण्यात आलं होतं. मात्र, आज शुक्रवारी दुपारी धामणगाव माल गावाजवळ अरुण मेश्राम यांच्या शेतालगत कालव्याला भगदाड पडल्याने शेतात पाणी साचलं. काही शेतकऱ्यांनी हा प्रकार लक्षात घेताच तात्काळ गोविंदपुर येथील सिंचाई विभागाला माहिती दिली. परिणामी, दुपारी नहराचं पाणी बंद करण्यात आलं आणि भगदाड बुजविण्याचं काम तातडीने सुरू करण्यात आलं.
घोडाझरी तलावाच्या कालव्याला भगदाड पडणं ही नवीन घटना नाही. ब्रिटिश काळात तयार झालेल्या या कालव्याची अवस्था अत्यंत जीर्ण झाली आहे. अनेक वर्षांपासून याची दुरुस्ती करण्यात आली नाही, त्यामुळे कालव्याची पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी झाली आहे. दरवर्षीच हा कालवा सोनापूर गावाजवळ किंवा अन्य ठिकाणी फुटतो.
यामुळे लाखो लिटर पाणी वाया जातं, आणि या पाण्याचा उपयोग शेतजमिनीत होण्याऐवजी पिकं खराब होतात. सिंचाई विभागाकडून दरवर्षी फक्त थातुरमातुर डागडुजी करून परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु पुन्हा काही दिवसांतच तीच परिस्थिती उद्भवते. लाखोंचा खर्च होऊनही कालव्याची पक्की दुरुस्ती करण्यात आलेली नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
या भगदाडामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना फटका बसला आहे. पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, शेतीच्या उत्पादनावर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाने घोडाझरी तलावाच्या कालव्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
#GhodazariCanal #CanalBreach #Nagbhid #ChandrapurDistrict #IrrigationIssues #WaterWastage #MahawaniNews