Lake Deepening | तलाव खोलीकरणाने मच्छीमार बांधवांना नवसंजिवणी

Mahawani

तालुक्यातील पाच तलाव खोलीकरणास मंजूरी : माजी आमदार निमकर यांच्या प्रयत्नांना यश !

  • महावाणी  - विर पुणेकर
  • ०६ ऑगस्ट २०२४

राजुरा/सास्ती : चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ९३० डी बामणी-राजुरा-लक्कडकोट च्या बांधकामासाठी माती, मुरूम व दगडांची आवश्यकता असून, तालुक्यातील विविध तलावांचे व नाल्यांचे खोलीकरण करून त्यातून निघणाऱ्या माती-मुरूमाचा वापर या कामात करण्यात यावा अशी मागणी राजुरा चे माजी आमदार सुदर्शन निमकर (Former MLA Sudarshan Nimkar ) यांनी प्रशासनाकडे केली होती. त्यावरून राजुरा तालुक्यातील पाच तलावांच्या खोलीकरणाचे काम मंजूर झाले असल्याने परिसरातीलं पाण्याच्या पातळीत वाढ होऊन मच्छीमार बांधवांना मच्छीमारीसाठी एक नवसंजिवनी मिळनार आहे.


राजुरा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या जलसंधारण (ल.पा) उपविभागात विविध माजी मालगुजारी तलाव व गाव तलाव आहेत. या तलावांच्या भरोशावर शेतकऱ्यांना संरक्षित पाणी व भोई समाज बांधवांची मच्छीमारी व सिंगाडा उत्पादन घेऊन उपजिवीका चालते. परंतु मागील अनेक वर्षांपासून या तलावांच्या खोलीकरणाकडे व स्वच्छतेकडे जलसंधारण विभागाचे दुर्लक्ष झाल्यामुळे अनेक तलाव इकोर्निया सारख्या वनस्पतीने व्यापले असून, या तलावात मच्छीमारी तसेच सिंगाडा उत्पादन घेणे बंद झाले आहे. त्यामुळे मच्छीमार बांधवांवर उपासमारीची संकट ओढवले होते.


हा प्रश्न निकाली काढण्यासाठी राजुरा चे माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी मागील अनेक दिवसांपासून शासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. तशातच राजुरा तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग चे बांधकाम सुरू झाले. त्याकरीता आवश्यक असलेली माती व मुरूम उत्खनन केल्यास तालुक्यातील तलावाचे खोलीकरण होईल व रस्त्यासाठी माती सुद्धा उपलब्ध होईल अशा हेतूने राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे मागणी केली होती. ना. मुनगंटीवार यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी यांनी तलाव खोलिकरणास प्रशासकीय मान्यता दिल्याने माजी आमदार निमकर यांच्या प्रयत्नांना यश येऊन राजुरा तालुक्यातील बामनवाडा, चुनाळा, सातरी, सुमठाणा व तुलाना या पाच तलावांच्या खोलीकरणास मंजूरी मिळाली असून, पावसाळा संपताच या तलावांचे खोलीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरातील पाण्याची पातळी वाढून मच्छीमार बांधवांना मच्छीमारी व सिंगाडा उत्पादनासाठी एक नवसंजीवनी मिळणार असून मच्छीमार बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.


माजी आमदार निमकर यांनी मागील काही महिन्यांपासून या तलावांच्या खोलीकरणाचा प्रश्न रेटून धरला होता अखेर त्यांच्या प्रयत्नांना यामाध्यमातून यश प्राप्त झाल्यामुळे मच्छींद्र मत्स्यपालन सहकारी संस्था राजुरा चे अध्यक्ष रत्नाकर पचारे, माजी अध्यक्ष विजय कार्लेकर, उपाध्यक्ष अमित मांढरे, आकाश पारशीवे, दिलीप कार्लेकर, नागेश पचारे, राकेश कार्लेकर, अरूण कार्लेकर, गिरजाबाई मांढरे, सुलोचना मांढरे, मारोती कार्लेकर, घनश्याम कार्लेकर, कैलास कार्लेकर सह तालुक्यातील भोई समाज बांधवांतर्फे आभार मानले आहेत. 


#mahawani #chandrapur #rajura #LakeDeepening #sudarshannimkar

To Top