गोंडवाना विद्यापीठात सावरकर साहित्य अध्यासन केंद्राचे भव्य उद्घाटन
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर Vinayak Damodar Savarkar साहित्य अध्यासन केंद्राचे उद्घाटन दि. १२ डिसेंबर रोजी मोठ्या दिमाखात करण्यात आले. हा सोहळा प्रसिद्ध अभिनेते आणि मुंबई विद्यापीठ नाट्य कला अकादमीचे संचालक प्रा. योगेश सोमण यांच्या हस्ते पार पडला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात सावरकरांच्या बहुआयामी कर्तृत्वाची उजळणी करण्यात आली.
प्रा. योगेश सोमण यांनी आपल्या भाषणातून सावरकरांच्या अफाट साहित्यिक कर्तृत्वावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “सावरकरांचे व्यक्तिमत्त्व ३६० अंशांचे होते. त्यांच्या साहित्यात कोणताही कोपरा सुटलेला नाही. अगदी ‘गरमागरम चिवडा’ या नावाने त्यांनी तत्कालीन राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारे लिखाण केले.” सावरकरांनी अंदमानातील काळ्या पाण्याच्या तुरुंगात केवळ एका लोखंडी तुकड्याने भिंतीवर महाकाव्य कोरल्याचे अनोखे उदाहरणही त्यांनी दिले.
प्रा. सोमण पुढे म्हणाले, “इंग्रजांनी भारतीय इतिहासाचे स्वरूप बदलण्याचा प्रयत्न केला, पण सावरकरांनी ‘१८५७ चे स्वातंत्र्य युद्ध’ या ग्रंथातून इतिहासाचा खरा चेहरा उलगडला. त्यांचे ग्रंथ एवढे प्रभावी होते की छापण्याआधीच त्यांच्यावर बंदी आली. मात्र, अलीकडच्या काळात सावरकरांच्या कर्तृत्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे.”
साहित्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार
कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी सावरकरांच्या साहित्यिक योगदानाची महती सांगितली. ते म्हणाले, “सावरकरांच्या साहित्याने एक संपूर्ण पिढी घडवली आहे. त्यांचे विचार आजही मार्गदर्शक ठरत आहेत. गोंडवाना विद्यापीठ सावरकरांच्या साहित्याचे अध्ययन आणि संशोधनासाठी कायमच प्रयत्नशील राहील.” विद्यापीठाच्या सर्व अध्यासन केंद्रांसाठी निधीची कमतरता पडू न देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा सन्मान
या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित बोधचिन्ह स्पर्धेत राजन लांजेवार यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर बन्सी कोठेवार आणि यश कुमार अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. विजेत्यांना अनुक्रमे ₹५०००, ₹३००० आणि ₹२००० रोख रक्कम व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरुदास कामडी यांनी केले, तर अध्यासन केंद्राची माहिती यश बांगडे यांनी सादर केली. डॉ. सविता गोविंदवार यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन केले. समन्वयक डॉ. चैतन्य शिनखेडे यांनी आभार प्रदर्शन केले. पुनम आमवार व सोनाली पुराम यांनी सावरकरांच्या साहित्यावर आधारित गीत सादर करून वातावरण भारावून टाकले. या प्रसंगी व्यवस्थापन परिषद सदस्य स्वप्निल दोंतुलवार, प्रशांत दोंतुलवार, डॉ. प्रशांत मोहिते, नंदाजी सातपुते, सिनेट सदस्य संजय रामगिरवार, धर्मेंद्र मुनघाटे आणि स्वरूप तारगे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा सत्कार विद्यापीठाच्या वतीने करण्यात आला.
हे वाचा: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर दगडफेक; समाजात तीव्र संताप
सावरकरांच्या साहित्याचा प्रभाव
सावरकर साहित्य अध्यासन केंद्र हे केवळ सावरकरांच्या विचारांचा अभ्यास करण्याचे स्थळ नसून, सावरकरांनी उभारलेला साहित्यिक वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रकल्प आहे. सावरकरांचे साहित्य आजही सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक विचारांना प्रेरणा देते. गोंडवाना विद्यापीठाच्या या उपक्रमामुळे सावरकरांच्या साहित्यिक विचारांना नवी दिशा मिळेल. त्यांचे कर्तृत्व आजच्या युवकांसाठी आदर्श ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
#Mahawani #VeerPunekar #MahawaniNews #Chandrapur #Rajura #Korpana #Savarkar #GondwanaUniversity #MarathiNews #SavarkarLiterature #FreedomFighter #HistoricalEvents #IndianLiterature #InspirationalLeaders #UniversityInauguration #CulturalHeritage #StudentAchievements #LiteraryCenter #ResearchInitiatives #EducationalDevelopment #NationalHistory #Patriotism #IndianFreedomStruggle #LiteraryContributions #CulturalPrograms #YouthInspiration #VeerSavarkar #IndianCulture #LiteraryEvent #SocialReforms #NationalIntegration #SwatantryaveerSavarkar #SavarkarStudyCenter #LiteraryAwards #CreativeCompetition #HistoricalFigures #UniversityEvents #IndianHistory #InspiringSpeeches #FreedomMovement #EducationalProgress #SavarkarIdeas #StudentParticipation #LiteraryStudies #IndianTradition #MotivationalLeaders #SavarkarWritings #LiteraryExcellence #EducationalInitiatives